उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ स्मरणात राहतील – जयंत पाटील

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिय समोर येऊ लागल्या आहेत.  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा गौरव केला आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने जनतेसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेच्या मनात दीर्घकाळ राहतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे

काय म्हणाले आहेत जयंत पाटील?

महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा अद्भूत प्रयोग शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष त्यांनी एकत्र आणले. गेल्या अडीच वर्षापासून शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना या सरकारने आणल्या. लोकपयोगी कामं केली. आज महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधून राजीनामा दिला. महाराष्ट्राला एक सरळ, चांगला आणि लोकांच्या सेवेसाठी वाहिलेला मुख्यमंत्री मिळाला होता. त्यांचं शेवटचं भाषण मुख्यमंत्री म्हणून केलं असलं तरी त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

उद्धव ठाकरे यांनी सोबत काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं सरकार होतं. भाजपची संख्या जास्त होती. मात्र तीन पक्षांची बेरीज एकत्र आली. मात्र दुर्दैवाने शिवसेनेचे आमदार शिवसेनेपासून दुरावले. ते जरी म्हणत असले की आम्ही शिवसेनेत आहोत तरीही त्यांचा पाठिंबा नाही हे कळल्यावर उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं एक चांगलं सरकार, स्वच्छ कारभार करणारं सरकार गेलं आहे. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केलं. त्यांनी एक वेगळा आदर्श ठेवला. अनेक चांगल्या कामांमध्ये लोकांना प्रोत्साहन देऊन काम करून घेतलं. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना दीर्घकाळ लक्षात ठेवेल असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Share