संमेलन ऐतिहासिक होण्यासाठी उदगीरकरांनी झोकून देऊन काम करावे : बनसोडे

लातुर : आजपर्यंत झालेल्या ९४ साहित्य संमेलनापेक्षा उदगीरचे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आगळेवेगळे, ऐतिहासिक संमेलन करण्यासाठी उदगीरकरानी स्वतं:ला झोकून देऊन काम करावे असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळ पदाधिकारी, व साहित्यप्रेमी नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, सचिव माजी आ. प्रा. मनोहर पटवारी, उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे उदगीर शाखेचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, माजी आ. गोविंद केंद्रे, धर्माजी सोनकवडे, राम गुंडीले, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, सुधीर भोसले, बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार येणकीकर, मनोज पुदाले, यासह आदी उपस्थित होते.
मंत्री संजय बनसोडे म्हणाले की,  भोतिक विकासाबरोबर बौद्धिक विकास होणे गरजेचे आहे, त्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला. या संमेलनात सर्वच राजकीय पक्षाचे नेते, विचारवंत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ यासह विविध क्षेत्रातील मान्यवर निमंत्रीत केले जाणार आहे. उदगीर मतदार संघातील गावागावात हे संमेलन जावे यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व साहित्य चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन काम करावे असे आवाहन यावेळी राज्यमंत्री  बनसोडे यांनी केले. जिल्ह्यात आजपर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलन मिळाले नाही. उदगीरला हा मान मिळाला आहे, त्यामुळे हे संमेलन ऐतिहासिक होणार यात शंका नाही असा विश्वास ही यावेळी व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांची व्यापक बैठक, जिल्ह्यातील सर्व साहित्यिक यांची जिल्हास्तरीय बैठक घेऊन या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ही  बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र तिरुके यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी भावी पिढ्यांच्या मनावर कोरले जाणारे हे संमेलन असून उदगीरला हा मान मिळाला ही अभिमानाची बाब आहे. हे कोणा एका पक्षाचे, धर्माचे व्यासपीठ नसून ते मराठी भाषा व साहित्याचा गौरव करणारे संमेलन असल्याचे तिरुके म्हणाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. राजकुमार मस्के यांनी केले.
Share