लखनौ- उत्तरप्रदेशात निवडणूकीचे वारे जोरदार वाहत आहेत. त्यातच भाजपातील तीन मंत्री आणि सात आमदारांनी भाजपला रामराम ठोकला तर दूसरीकडे सपा आणि इतर काही पक्षातील नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.त्यातच १३ जानेवारीला काँग्रेस कडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली . आज भाजपची पहिल्या आणि दूसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदार संघदेखील जाहिर करण्यात आला. योगी आदित्यनाथ गोरखपूर विधानसभेतून निवडणूक लढणार आहेत.
विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर त्यांच्यासाठी गोरखपूर शहर हा मतदारसंघ राखीव करण्यात आला आहे. योगी याआधी गोरखपूरच्या पारंपारिक मतदरासंघातून संसदेत जात होते. त्यांच्याशी संबंधित मठाचा हा मतदारसंघ आहे. आता विधानसभेला देखील ते याच ठिकाणाहून निवडणूक अर्ज भरणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे प्रयागराज जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत.