Uttarakhand Election Result 2022 : उत्तराखंडमध्ये भाजपचा बोलबाला

उत्तरखंडः उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा , पंजाब आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. उत्तराखंडमध्ये अकरापर्यंत सर्व जागांचे कौल हाती आले आहेत. त्यानुसार ७० जागांपैकी ४५ जागांवर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतलीय. त्यामुळे उत्तर प्रदेशानंतर येथेही भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खात्यात २१ जागा फक्त दिसत आहेत.

२०१७ ची परिस्थिती

उत्तराखंडमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला बहुमत मिळालं होतं. भाजपने तब्बल ५६ जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसला मात्र ११ जागाच मिळवण्यात यश आले होते. तर तीन जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या होत्या. उत्तराखंडमध्ये २०१७ साली ६५.५६ टक्के मतदान झाले होते तर यंदा मात्र ६५.३७ टक्के मतदानाची टक्केवारी आहे.

उत्तराखंड विधानसभेसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागा आहेत. या सर्व जागांसाठी एकाट टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदान झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस बहुमताने उत्तराखंडमध्ये सत्तेत येणार असल्याचा दावा केला होती. उत्तराखंडमध्ये काँग्रेस ७० पैकी ४८ जागा मिळणार असल्याचे रावत म्हणाले होते.

Share