नाशिक : जिल्हा ग्रामीण पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीतून २३ चारचाकी व ८० दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामुळे नाशिक पोलिस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला वाहनांचे पाठबळ लाभले आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. पोलीस अधिक्षक कार्यालय नाशिक (ग्रामीण) येथे अयोजित ग्रामीण पोलीस वाहनांचे वितरण कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमत: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेली बहूतांश वाहने ही महिला सुरक्षा निर्भया पथकांसाठी महिला अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आली आहेत. डायल ११२ ही कार्यप्रणाली सुद्धा लवकरच कार्यान्वित होत असून, या प्रणालीत मध्यवर्ती वाॅर वॉर रूमच्या नियंत्रणाखाली ही सर्व वाहने असणार आहेत. प्रत्येक गाडीचे लोकेशन वॉर रूमला या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, घटनास्थळी जेथे दुर्घटना घडली असेल किंवा नागरिकांना पोलीसांची मदत हवी असेल अशा ठिकाणी विनाविलंब सिग्नलद्वारे यंत्रणेला सूचना मिळून पोलीसांची मदत वेळेत उपलब्ध होणार आहे. यामुळे महिला सुरक्षा व्यवस्थेत चोखपणे काम करता येणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
आज पोलीस अधिक्षक कार्यालय नाशिक (ग्रामीण) येथे ग्रामीण पोलीस वाहनांचे वितरण कार्यक्रम पार पडला.#नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलास जिल्हा नियोजन समितीतून 23 चारचाकी व 80 दुचाकी वाहनांची उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे नाशिक पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला वाहनांचे पाठबळ लाभले pic.twitter.com/aomyXkMPor
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 26, 2022
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेंकर, पोलीस निरीक्षक विशेष शाखा अकबर पटेल, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक पंकज पवार, राखीव पोलीस निरीक्षक सुरेश चव्हाण,पोलीस निरीक्षक मिलिंद तेलुरे, जितेंद्र मोटर्स प्रा.ली. संचालक जितेंद्र शाह यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.