दिल्लीश्वर कितीही कपटी असला तरी महाराष्ट्र झुकणार नाही

पुणे :  आपले सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे. त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मंत्र्यावर धाडी टाकल्या जात आहे. अनिल देशमुख यांना खोट्या आरोपात गोवलं, नवाब मलिक यांना खोट्या आरोपात गोवलं, मलिक एनसीबी विरोधात बोलत होते म्हणुन त्यांना त्यांची भूमिका मांडू न देता त्यांना अटक करण्यात आली. जाणीवपूर्वक दाऊदचं नाव घेतले गेले आणि एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला तुरुंगात टाकले अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी केली आहे.

मावळाच्या भूमीने आपल्याला शिवरायांचे शौर्य सांगितले आहे. दिल्लीश्वर कितीही कपटी असला कितीही कारस्थानी असला तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. ही परंपरा शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू आहे, ती यापुढेही कायम राहील असा विश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.

जयंत पाटील मावळमध्ये आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपच्या कारवायांवर जोरदार निशाणा साधला. आपल्या विरोधात कारवाया सुरू आहेत. तुम्ही याची नोंद घ्या, आम्ही ठामपणे सांगतो की, महाविकास आघाडी ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आली आहे. कोणीही किती अडथळे आणले तरी महाराष्ट्र सरकार आपले काम पूर्ण करणारच, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Share