सांगलीः विद्रोही लेखणीने तमाशा क्षेत्रातून करमणुकीच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणारे नावाजलेले शाहीर राजाराम यशवंत पाटील उर्फ राजा पाटील यांचे हदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
शाहीर राजा पाटील यांनी १९९० च्या दशकात तमाशा आणि शाहीरी लोककला महाराष्ट्रभर सादर करुन लोककलेचा जागर केला. तसेच काळू बाळू तमाशा मंडळ, गणपत व्ही.माने चिंचणीकर, दत्त महाडीक पुणेकर, रघुवीर खेडकर, काताबाई सातारकर, या तमाशांना वगनाट्य दिली आणि ती महाराष्ट्रभर गाजली. तसेच, माणूस माणसाचा वैरी, बापू बिरु वाटेगावकर, कृष्णा मिळाली कोयनेला अशी नाटकंही शाहीर राजा पाटील यांनी लिहून अजरामर केली.
शाहीर राजा पाटील यांनी ४० वर्ष लोकनाट्य तमाशा सेवेत तमाशा कलावंत आणि वगनाट्य लेखक म्हणून सेवा केल्यानंतर संत तुकोबांच्या विचाराने प्रेरित होऊन ते जीवन जगले. शाहीर राजा पाटील यांनी सन २०११ साली वारकरी संप्रदायाची माळ घातली आणि अध्यात्माचा वसा कायम स्वीकारून सतत तुकोबांच्या विचारात आणि चिंतनात राहून हा विचार आपल्या पोवाड्यातून पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. सन २०२० साली कोरोना महामारीच्या काळात शाहीर राजा पाटील यांनी आपल्या चिंतनातून कोरोनाविषयी जनजागृती व्हावी म्हणून ‘कोरोना योद्धा’ हा पोवाडा तयार केला. त्याचा पहिला प्रयोग पलूस येथील तमाशा लोककलावंतांच्या कार्यशाळेत सप्टेंबर २०१४ मध्ये सादर केला