मुंबई : राज ठाकरेंना आम्ही वेळ आल्यानंतर नक्कीच उत्तर देऊ. ही काही उत्तर देण्याची वेळ नाही. सध्या राज्यासमोर आणि देशासमोर मोठे प्रश्न आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
राज ठाकरे यांनी काल ठाणे येथे झालेल्या सभेत जोरदार टोलेबाजी करत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर टीका केली होती. अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. एकाच घरात राहून रेड टाळणे सुप्रिया सुळेंना कसे जमले, असा सवाल राज ठाकरेंनी विचारत, सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असल्याची टीकाही केली होती. शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतेय असा आरोप त्यांनी केला होता.
अजित पवारांच्या घरी धाड पडलेली नसल्याचे सुळेंनी सांगितले. राज ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर आरोप केले. त्यांच्या बोलण्यात काहीच तथ्य नव्हते. एखादी करमणूक असते किंवा एखादा सिनेमा असतो, त्यात थोडा मसाला असतो. राज ठाकरेंच्या भाषणाकडे फक्त करमणूक म्हणून पाहावं, असे त्या म्हणाल्या.
ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दुखावलं, त्यांच्या टीकेबद्दल काय बोलणार? असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंना लगावला.