‘सिल्व्हर ओक’ हल्‍ला प्रकरण : गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावरील हल्‍लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईतील गिरगाव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर इतर १०९ आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, सातारा पोलिसांनी ॲड.सदावर्तेंचा ताबा देण्याची केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली असून, सदावर्तेंना १७ एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताबा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सातारा पोलिस सदावर्तेंना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

गेल्या गुरुवारी ७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर झालेल्या सभेत ॲड.सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरात शिरण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रेरित होऊन काही कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिल रोजी दुपारी शरद पवार यांच्या मुंबईतील भुलाभाई देसाई मार्गावरील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानात घुसून हिंसक आंदोलन करीत चप्पलफेक आणि दगडफेक केली होती.

या हल्ल्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण ११० जणांना अटक केली होती. ॲड. सदावर्ते यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी सदावर्तेंना पुन्हा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी दिली जावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद…
मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनी आजही न्यायालयात आक्रमक पद्धतीने बाजू मांडत युक्तिवाद केला. ॲड. घरत यांनी न्यायालयात आंदोलनासंदर्भात अनेक खुलासे केले. सदावर्तेंनी विविध एसटी डेपोमधून पैसे गोळा केले, घेतलेल्या पैशाच्या पावत्या नाहीत. अशा व्यवहारांचा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचल्याचे पोलिस तपासात समोर आल्याची माहिती ॲड. घरत यांनी कोर्टात दिली. या प्रकरणात जयश्री पाटील यांची भूमिका समोर आली असून त्यांच्याकडे २ कोटींहून अधिक पैसे जमा करण्यात आले आहेत. ॲड. सदावर्ते यांनी लिहून ठेवलेल्या सर्व हिशोबाची डायरी पोलिसांच्या हाती लागलीय, हा सर्व पैसे कुठे खर्च झाला, याचा तपास पोलिसांना करायचा असल्यामुळे सदावर्ते यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी ॲड. घरत यांनी केली.

सदावर्तेंच्या वकिलांचा युक्तिवाद…
दुसरीकडे ॲड. सदावर्ते यांच्या वकील ॲड. मृण्मयी कुलकर्णी यांनीही घरत यांची बाजू तेवढ्याच आक्रमक पद्धतीने खोडून काढत सदावर्ते यांना पोलिस कोठडीची कशी गरज भासत नाही, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ॲड. मृण्मयी कुलकर्णी यांना ॲड. घरत यांचे आरोप खोडून काढत सदावर्तेंना पोलिस कोठडी का देऊ नये, अशा प्रकारचा युक्तीवाद केला. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वकील मृण्मयी कुलकर्णी यांनी सूडबुद्धीने पोलिस कारवाई करत असल्याचा आरोप केला. तसेच आरोपींना पोलिस कोठडी का हवी, याचे एकही कारण किंवा पुरावा पोलिस देऊ शकले नाहीत. सूडभावनेने पोलिस सदावर्तेंशी वागत आहेत, असे त्या म्हणाल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद वाद ऐकल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायमूर्ती एन. एम. पटेल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

Share