औरंगाबाद : सात जन्म हाच पती लाभावा तसेच पतीच्या दिर्घायुष्यासाठी सुवासिनी वडाच्या झाडाला फेरे मारुन वटपौर्णिमा साजरी करतात. परंतू औरंगाबादमध्ये पत्नीपिडीतांकडून पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारुन पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी आम्हाला सात जन्म काय, सात सेकंदही अशी भांडकुदळ बायको नको बाबा म्हणत, पत्नी पीडितांनी पिंपळाच्या झाडाला उलटे फेरे मारत पिंपळ पौर्णिमा साजरी केली.
गेल्या ७-८ वर्षांपासून पत्नी पीडित आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते. हे मुंजा आम्हाला अशा भांडकुदळ बायका देऊन मरण यातना देण्यापेक्षा कायमस्वरूपी मुंजा ठेव, असं साकडं यावेळी पत्नी पीडितांनी पिंपळाच्या झाडाला घातलं. औरंगाबादमधील वाळूज परिसरात बायकोच्या रोजच्या कटकटीला कंटाळून तिच्या पासून सुटकारा मिळो म्हणून अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. पिंपळपौर्णिमा साजरी करण्याविषयी पुरूषांनी सांगितले की, ‘आमचं नेमकं दु:ख असं आहे की, आम्ही सुखी संसाराची आशा ठेवून मोठ्या आनंदाने लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर बायकोने जे भांडणं सुरू केलय ते संपतच नाहीये.’