मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा पोटनिवडणुक होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठ विधान केलं आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी याबाबत म्हटलं की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भाजपने ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
भाजप विरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील, असं नाना पटोले यांनी म्हटलं.