उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; २ खासदार, ५ आमदार शिंदे गटात सामील होणार?

मुंबई : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु आहे. असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटातील २ खासदार आणि ५ आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी केला आहे. कृपाल तुमाने हे नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.

खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून मोहन भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. हिंदूंचं रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांचे विचार ऐकून पुढे जावं यासाठी येत असतो. याआधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईत जायचो. पण आता बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील. राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याला गतिमान सरकार मिळालं आहे.

राज्याचे ५० आमदार आणि १२ खासदार सोबत आहेत. आज दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. शिंदेसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासोबत आम्ही गेलेलो नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली. तसेच जे आमदार, खासदार प्रवेश कऱणार आहेत त्यांची नावं संध्याकाळीच सर्वांना कळतील. मुंबई, मराठवाडा कुठलेही ते असू शकतात. प्रभावी खासदार आमच्याकडे आलेले दिसतील. ज्या आमदारांना, खासदारांना आमचे विचार पटत आहेत, ते आमच्याशी संपर्क साधत सोबत येण्याचा प्रयत्न करत आहेत. जे येतील त्यांना सोबत घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

Share