हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत? पवारांचा सवाल

मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे. काल बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटले आहे, कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत? निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय, असं रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणं हा कसला संवाद?राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळं महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय. पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढं न झुकणारा महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नसल्याचा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे.

दरम्यान, काल बेळगावजवळील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. यावेळी एकूण सहा ट्रकवर शाईफेक आणि दगडफेक करत करण्यात आली. या हल्ल्याचा राजकीय पक्षांसह महाराष्ट्र सरकारकडूनही निषेध करण्यात आला होता.

Share