दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही

मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे. काल बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. याविरोधात सर्वच स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत आपल्या ट्विट म्हणतात, दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे, असा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, तीन महिन्यांपूर्वी आम्ही क्रांती केली. आता क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा-पेचा कधीच झाला नव्हता. यांनी तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले आहे. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली, असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. यावेळी कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकची नासधूस करण्यात आली. कर्नाटक पोलीस आणि वेदिकेचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्कीही झाल्याचे पाहायला मिळाले.

Share