‘ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात’ आव्हाडांची केसरकरांवर टीका

मुंबई : शिवसेना जेव्हा फुटली त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार होते, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर यांनी केलेल्या या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर देत ‘अहो केसरकर किती बोलता पवार साहेबांविरोधात , एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ट्वीट मध्ये म्हणतात, “अहो केसरकर किती बोलता पवार साहेबांविरुद्ध? एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? २०१४ ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन, जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.

दीपक केसरकर काय म्हणाले?

शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले होते. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, नारायण राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितल्याचा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले. राज ठाकरे यांच्या पाठिशीही शरद पवार यांचे आशीर्वाद होते. कारण, शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, असे सूचक वक्तव्यही दीपक केसरकर यांनी केले.

Share