पणजी- देशात ५ राज्याच्या निवडणूका केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर करण्यात येत आहे आणि प्रचाराला देखील वेग आला . अशातच आपने सोमवारी पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भगवंत मान यांना जनते समोर आणलं. आता आपने गोव्यात देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला आहे. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून अमित पालेकर यांचं नाव समोर आलं आहे.
कोण आहेत अमित पालेकर ?
अमित पालकेर हे पेशाने वकील आहेत. पालेकरांची ही पहिलीच निवडणूक आहे. गेल्या वर्षी ऑक्टाबर महिन्यात त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गोव्यातील हेरीटेज स्थानांवर झालेल्या बेकायदेशीर बांधकामांविरूध्द आवाज उठवला .
भ्रष्टाचारामुळे सरकारी नोकरी न मिळाल्याने त्यांनी गोव्यातील नोकरी घोटाळा बाहेर काढला. प्रामाणिक आणि भ्रष्टाचार मुक्त गोव्या करण्यासाठी त्यांनी पवित्रा उचलला असून ते आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत.
गोव्यातील आपचं राजकीय समीकरण काय ?
एकीकडे आप जात धर्म विरहीत राजकारणाचा प्रचार करत असली तरीही पालेकर हे अपवाद ठरणार नाहीत. कारण पालेकरांच्या उमेदवारी मागे आपचं जातीय समीकरण दडलं आहे. अमित पालेकर हे भंडारी समाजाचे असून गोव्यात जवळपास ३५ टक्के हा समाज आहे.
गोव्यातील भंडारी समाजात कायम अन्यायाची भावना आहे. कारण आजवर गोवा मुक्त झाल्यापासून अडीच वर्षासाठीच भंडारी समाजाचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे आप या निवडणूकीत शून्याचा भोपला फोडणार का ? हे पाहणं आवश्यक ठरेल .