नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. जगदीप धनखड यांना ५२८ टक्के मतं तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली आहेत. तर धनखड देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून ११ ऑगस्टला शपथ घेतील. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे.
धनखड यांना ७२५ मतांपैकी ५२८ मते मिळाली. ३४६ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. तर १५ मते अवैध ठरली आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली. उपराष्ट्रपतीपदासाठी ९२.९४ टक्के मतदान झाले आहे.
कोण आहेत जगदीप धनखड?
जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थानमधील झुंझुनूच्या किठाना गावात झाला. अजूनही गावात त्याचे घर आहे आणि अनेकदा ते तेथे ये-जा करतात. त्यांचे वडील चौधरी गोकुलचंद धनखर हे शेती करत होते. जगदीप धनखर यांनी चित्तोडगड येथील सैनिक शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर राजस्थान युनिव्हर्सिटी जयपूरमधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. १९७७ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आणि १९८६ मध्ये ते वयाच्या ३५ व्या वर्षी हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष बनले. जगदीप धनखर हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील राहिले आहेत. राजस्थानमध्ये जाटांना आरक्षण मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९८९ ते १९९१ नवव्या लोकसभेतील झुंझुनू येथून ते खासदार आणि केंद्रात मंत्री बनले. व्हीपी सिंह यांच्या सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्रालयात ते उपमंत्री बनले होते. त्यापूर्वी १९९३-९८ दरम्यान १० व्या विधानसभेत राजस्थानमधील किशनगडमधून ते विधानसभेवर निवडून गेले होते. ३० जुलै २०१९ रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती