सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खाज का सुटली? तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान

उस्मानाबाद : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. राज्यात सत्तांतर झाल्यावर लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मेळाव्यात बोलताना तानाजी सावंत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

काय म्हणाले तानाजी सावंत?
महाविकास आघाडीवर टीका करताना तानाजी सावंत म्हणाले, ‘२०१९ मध्ये तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आले. त्यानंतर पुढच्या ६ महिन्यांत आरक्षण गेलं, तेव्हा आंदोलन वगैरे झालं नाही, सगळे शांत बसले. पण जसंच सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली’, असं तान्हाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना सावंत म्हणाले, ‘यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहित असंही ते म्हणाले. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही’. असा आरोपही तान्हाजी सावंत यांनी महाविकास आघाडीवर केला.

‘आरक्षण दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही’

मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असंही तान्हाजी सावंत यांनी म्हटलं आहे. ‘माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळायलाच पाहिजे. आम्ही सोडणार नाही घेतल्याशिवाय. ज्या समाजात मी जन्म घेतला त्या समाजासाठी सत्ता सोडायची वेळ आली तरी सोडेन, असं तानाजी सावंत म्हणाले.

दरम्यान, एकीकडे सत्तेत आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची पावले उचलली. यानंतर आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, दुसरीकडे तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणबाबत केलेल्या विधानामुळे शिंदे सरकार चांगलंच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Share