संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढणार की, जामीन मिळणार?

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना आज जामीन मिळणार की कोठडी ? याचा आज फैसला होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना १ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.

संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास १०३४ कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊतांना दोनवेळा समन्स बजावले होते. पण राज्यसभेचं पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊतांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. अखेर ईडी अधिकाऱ्यांनी ३१जुलैला सकाळी ७:३० वाजता संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी धाड टाकली. तिथे त्यांनी दिवसभर संजय राऊतांच्या मैत्री बंगल्याची झडती घेतली. तसेच राऊत कुटुंबांची चौकशी केली. ईडीचं एक पथक राऊतांच्या मुलीला घेवून त्यांच्या दादर येथील दुसऱ्या निवासस्थानी गेलं होतं. राऊतांच्या दादर येथील घरी देखील झडती घेण्यात आली होती. दिवसभर तपास केल्यानंतर राऊतांनी संध्याकाळी चार वाजता ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर ईडी कार्यालयात नेलं होतं. अखेर रात्री उशिरा ईडीने चौकशी करुन संजय राऊतांना अटक केली होती.

Share