भाजप पुरस्कृत अपक्ष सदाभाऊ खोत यांची माघार

मुंबई : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनीही आपला डमी अर्ज मागे घेतला आहे. म्हणजे आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या महाविकास आघाडीकडून ६ तर भाजपकजून ५ उमेदवार असणार आहेत. त्यामुळे निवडणूक होणार असून घोडेबाजाराला उत येण्याची शक्यता आहे.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली गेली होती. तर, भाजपच्या पाठिंब्यावर सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर ११ अर्ज कायम राहिल्यानं विधानपरिषदेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. भाजपकडे १०६ इतकं संख्याबळ असल्याने पहिले ४ उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला संघर्ष करावा लागणार आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन भाजपने सदाभाऊ खोत यांना अर्ज मागे घ्यायला लावला.

Share