काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी पूर्ण होऊ शकणार नाही : पटोले

मुंबई : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून भाजपच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी म्हटले आहे.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्र दौरा आणि राजकीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, केंद्रीतल भाजपा सरकार हुकुमशाही वृत्तीने वागत आहे. संविधान आणि लोकशाही संपवण्याचे आणि देशाची मालमत्ता विकण्याचे काम सुरु आहे. भारतीय जनता पक्ष विरोधकांसोबतच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणा-या मित्र पक्षांनाही संपवत आहे. याचा अनेक पक्षांना अनुभव आल्याने आता ते पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी उघडपणे केंद्रातील भाजप सरकारविरोधी भूमिका घेऊन भाजपा विरोधात आघाडीसाठी प्रयत्न चालवले आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अशा आघाडीसाठी विविध राज्यात जाऊन नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. पण पुढे यासंदर्भात काही ठोस घडले नाही. के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत होईल अशा भूमिका घेतल्या होत्या पण आता भाजपबद्दलचे त्यांचे विचार बदलले आहेत.

भाजप हा लोकशाही आणि संविधानविरोधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. के. चंद्रशेखर राव यांच्याप्रमाणेच विविध राजकीय पक्ष आणि देशातील सर्वसामान्य जनतेला भाजपचा खरा चेहरा लक्षात आला असून देशातील जनता भाजपला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस आणि मित्रपक्षांची यूपीए आघाडी हीच भाजपाविरोधात सक्षम पर्याय असून काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची भाजपला पर्याय होऊ शकत नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
Share