माझे शब्द लिहून ठेवा, बाप-बेटे तुरुंगात जाणारच राऊतांची पुन्हा डरकाळी

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या याचे पुत्र नील सोमय्या यांनी गैरव्यवाहर केला नाही तर मग अटकपूर्व जामिनासाठी त्यांची इतकी पळापळ का सुरु आहे. कोणत्या गुन्ह्याखाली त्यांना अटक होणार, याची स्पष्टताच नाही. मग अटकपूर्व जामिनासाठी ते धावाधाव का करत आहेत, असा सवाल शिवसेना खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की,  पीएमसी घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. हळूहळू सगळ्यांना समजेल. ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत? जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे बाप-बेटे दारोदार या कोर्टातून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. त्याची गरज तुम्हाला का पडतेय? यातच सगळं स्पष्ट होतंय. मी जे साडेतीन म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा”, असं संजय राऊत म्हणाले.

“त्या साडेतीन लोकांची नावं जाहीर केली, तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तसतसं तुम्हाला समजेल. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठमोठ्या गप्पा करतात, ते सगळे तुरुंगात जाणार आहेत”, असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “हे एक प्रकरण नाही. अनेक प्रकरणं आहेत, ज्यामध्ये हे बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. त्याच्याबरोबर अनेक अधिकारी, केंद्रीय तपास यंत्रणांनी जे घोटाळे करुन ठेवले आहेत. यातली काही प्रकरणं मी पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केली आहेत. काही पुराव्यासह माझ्याकडे आहेत. अधिवेशन संपलं की, मी समोर येऊन सांगेल. ज्या अधिकाऱ्यांना वाटतं की, आपलं राज्य आहे. ते भ्रमात आहेत.”

Share