नागपूरः विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
हवामान खात्याकडून यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. शुक्रवार आणि शनिवारीसुद्धा वातावरण ढगाळच राहणार आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी हा आठवडा अवकाळी पावसाचा ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1480840533647839233?s=20
भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गोंदियात १५ ते २० मिनिटे झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिके आणि भाजीपाल्याला बसण्याची शक्यता आहे. तसेच सध्या खरीप हंगामातील धानखरेदी सुरू असून मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसल्याची माहिती आहे. पावसाने रब्बी पिकांसह भाजीपाला पिके संकटात सापडली आहे. या पावसाने लाख, लाखोळी, उडीद, हरभरा या कठाण पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.