भाजप तुमचा वापर करुन घेतंय हे तुम्हाला कसं कळत नाही, रोहीत पवारांचा मनसेवर निशाणा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. हा दौरा स्थगित करण्यामागचं कारण काय होतं हे राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत सांगितलं. इतकंच नाही तर आपला दौरा रद्द होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. यावरून राज्यात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं की, “राज ठाकेर साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करुन घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.

शरद पवारांच्या फोटोबद्दल बोलताना रोहित पवार म्हणतात, शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा…. तर पवार साहेब हे अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे ‘भारतीय कुस्ती संघा’चे अध्यक्ष आहेत… मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल. असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

दरम्यान, भाजपचे अनेक नेते राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं समर्थन करत असताना या दौऱ्याला आक्रमक विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना ताकद कुणी दिली, यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बृजभूषण यांच्या आधारे भाजप नेतृत्वानेच राज ठाकरेंचं खच्चीकरण केल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, मनसेने मात्र शरद पवार यांच्याकडे बोट दाखवल्याचं पाहायला मिळत आहे.

Share