चालत्या बसच्या चालकाचे गुटखा थुंकताना नियंत्रण सुटले; भीषण अपघातात ४ ठार

कोटा : धावत्या स्लीपर कोच बसच्या चालकाने गुटखा थुंकण्यासाठी तोंड खिडकीतून बाहेर काढले. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस ट्रेलरच्या मागच्या भागावर जाऊन आदळून भीषण अपघात घडला. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले, तर १० जण जखमी झाले. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली.

या अपघाताविषयी सिमरिया पोलिस ठाण्याचे हवालदार श्यामलाल गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर कोच बस गुजरात राज्यातील राजकोट येथून उत्तर प्रदेशमधील कानपूरला जात होती. कोटाच्या पुढे आल्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ वर बसचालकाने गुटखा थुंकण्यासाठी तोंड खिडकीतून बाहेर काढले. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस ट्रेलरच्या मागच्या भागावर जाऊन आदळली. कराडिया पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. त्यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या ३ आणि मध्य प्रदेशच्या एका प्रवाशाचा समावेश आहे. विरेंद्र सिंह, नारायण सिंह, जितेंद्र आणि जितू अशी मृतांची नावे आहेत. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Share