ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा पत्नीसह कोरोनाची लागण

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर, जॉन अब्राहम, एकता कपूर या कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. आता बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय खलनायकांपैकी एक असलेले ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना कोरोनाची लागम झाली आहे. त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे.

बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय खलनायकांपैकी प्रेम चोप्रा एक आहेत. प्रेम चोप्रा आणि उमा चोप्रा यांच्या लग्नाला सहा दशकांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांना रकिता, पुनीता आणि प्रेरणा चोप्रा या तीन मुली आहेत. प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोघांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. प्रेम चोप्रा ८६ वर्षांचे आहेत. चोप्रा यांच्या तब्येतीत होणारी सुधारणा लक्षात घेता त्यांना पुढील एक-दोन दिवसांतच डिस्चार्ज मिळेल, असे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर डॉ जलील पारकर उपचार करत आहेत. त्यांनी मागील ६० वर्षांत ३५० हून अधिक सिनेमे केले आहेत. ‘प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोप्रा’ हा बॉबी सिनेमातला त्यांचा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे.

Share