अभिमानास्पद! शिवरायांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; असा होणार फायदा

महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बाब समोर आली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली. महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे ११ किल्ले तर दक्षिण दिग्विजय मोहीमेत शिवरायांनी जिंकलेला तमिळनाडूतील जिंजी हा अशा एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाची पायाभरणी या गड-किल्ल्यांवर झाली. हे स्वराज्य भक्कम करण्यासाठी किल्ल्यांची निर्मिती झाली. आजही हे किल्ले अनेकांना प्रेरणा देतात. हे किल्ले मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत. म्हणूनच या किल्ल्यांचं जतन करणं अत्यावश्यक आहे. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळणं ही महत्वाची बाब आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ”हा अतिशय ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण असून आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्य सरकारचा मानाचा मुजरा आहे.” अशी प्रतिक्रया दिली आहे.

युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे जी जगभरातील ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचं संवर्धन करते. जागतिक वारसा यादीत अशा ठिकाणांचा समावेश केला जातो जे मानवजातीच्या वारशाचा भाग आहेत. या अंतर्गत या यादीत आता महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश झाला आहे.

जागतिक वारसा दर्जाचे फायदे काय होतील?

पर्यटनाला चालना
हा दर्जा मिळाल्यानं फक्त महाराष्ट्रच नाही तर देश-विदेशातील पर्यटक किल्ल्यांना भेट देतील. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

आर्थिक निधी सहाय्य
युनेस्कोच्या जागतिक वारसा निधीतून या किल्ल्यांच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी निधी प्राप्त होईल.

युद्धकाळात संरक्षण
जिनिव्हा करारानुसार या जागतिक वारसा स्थळांना युद्धकाळात नष्ट होण्यापासून संरक्षण मिळतं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे किल्ल्यांचं संवर्धन होईल. सोबतच पर्यटनाला चालना मिळून स्थानिक आर्थिक विकास होईल.

Share