मुंबई : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ज्यावेळी केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क (एक्साईज ड्यूटी) कमी करून राज्य सरकारांनाही हा कर कमी करण्याची विनंती केली होती; परंतु महाराष्ट्रातील ठाकरे सरकार नफेखोरीत व्यस्त होते, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ एप्रिल) घेतलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोनाविषयक आढावा बैठक घेतली. या बैठकीतच मोदींनी महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह बिगर भाजपशासित राज्यांच्या नावाचा उल्लेख करीत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसाठी राज्यांना जबाबदार धरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जीएसटीच्या थकित रकमेची आठवण करून देत मोदींना जशास तसे प्रत्युत्तर दिले. पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले असताना, आता यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लागोपाठ ३ ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात. दोषारोप आणि जबाबदारी झटकणे, यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का? असा बोचरा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला आहे.
फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “आरोप प्रत्यारोपाचा हा खेळ सुरक्षित आणि गैरकृत्य लपवण्यासाठी उपयुक्त आहे; पण त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ज्यावेळी केंद्र सरकारने इंधनावरील एक्साईज ड्यूटी कमी केली होती, त्यावेळी राज्यांनीही तसे करण्याची विनंती केली होती; पण महाराष्ट्रासह गैरभाजप शासित राज्ये ही केवळ नफेखोरीत व्यस्त राहिली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भरडले गेले. महाराष्ट्र सरकारने कर कमी न करता आतापर्यंत ३४०० कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी इंधनावरील कर कमी करावेत आणि मराठी माणसासह सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.”
मग अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का…?
जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै २०२२ आहे. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का? असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.
मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या
शेजारच्या दीव-दमणमध्ये १०३ रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात १२० रुपयांना का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे, असेही फडणवीसांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या, अशी आग्रही मागणी फडणवीसांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला आहे.