एलोन मस्कने हाती घेतला ट्वीटरचा कारभार; विजया गड्डे झाल्या भावूक

एलन मस्क यांनी ट्वीटर खरेदी केल्यानंतर ट्वीटरचा कारभार एलोन मस्क यांनी हातात घेतला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी ट्वीटरच्या पॉलिसी हेड विजया गड्डे यांच्यावर निशाणा साधला  विजया ट्विटरच्या बोर्ड मीटिंगमध्ये भावूक होऊन रडू लागल्या होत्या. सेन्सॉरशी संबंधित निर्णयामुळे मस्क विजया गड्डे यांना लक्ष्य करत असल्याने त्या भावूक झाल्याचे सांगितले जात आहे.

वास्तविक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्या लॅपटॉपवर एका विशिष्ट स्टोरीमुळे गड्डे यांनी न्यूयॉर्क पोस्टचे खाते निलंबित केले होते. त्यांच्या या निर्णयावर मस्क यांनी टीका केली असून हा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.

एलन मस्क यांनी पॉडकास्ट होस्ट सागर इंजेटी यांच्या एका ट्विटला रिप्लाय दिला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, एक योग्य बातमी प्रसिद्ध करण्यामुळे एका विशिष्ट वृत्तसंस्थेचे ट्विटर खाते निलंबित करणे अत्यंत चुकीचा निर्णय आहे.

48 वर्ष वयाच्या विजया गड्डे या ट्विटरची सुरक्षा, कायदेशीर समस्या आणि संवेदनशील बाबी हाताळतात. 2011 मध्ये त्यांनी ट्विटर जॉईन केले आणि तेव्हापासून त्या कंपनीचे कायदा आणि धोरणविषयक बाबी हाताळत आहे. विजया ट्विटरच्या कार्यकारी टीममधील सर्वात शक्तिशाली महिला असल्याचे मानल्या जातात. कंपनीच्या सेन्सॉरशी संबंधित निर्णयांसाठी विजया गड्डे यांना जबाबदार मानले जाते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्याचा निर्णयही विजया यांनीच घेतला होता.

भारतात जन्मलेल्या विजया गड्डे शक्तिशाली महिला म्हणून ओळखल्या जातात. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्याचा निर्णयही त्यांचाच असल्याचे बोलले जाते. 2020 मध्ये, त्यांनी ट्विटरचे तत्कालीन सीईओ जॅक डोर्सी यांना यूएस निवडणुकीत राजकीय जाहिराती विकू नयेत असे पटवून दिले होते.

Share