खाद्यतेल आणखी महाग होणार!

नवी दिल्ली : भारतात खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असून, अशात भारताने परदेशातून मोठ्या प्रमाणात पामतेलाची आयात केली तर त्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण, इंडोनेशियाने २८ एप्रिलपासून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या भारतीयांवरील बोजा आणखी वाढणार आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाने देशात आधीच महाग असलेले खाद्यतेल आणखी महाग होणार आहे.

इंडोनेशिया हा जगातील सर्वांत मोठा पाम तेल उत्पादक देश आहे, तर मलेशियाचा दुसरा क्रमांक येतो. इंडोनेशियाने याआधीही जानेवारीमध्ये पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाने भारतातील पाम तेलाच्या आयातीवर वाईट परिणाम होणार आहे. भारताला आता मलेशियावर अवलंबित्व वाढवावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारत सुमारे नऊ दशलक्ष टन पाम तेल आयात करतो. यापैकी ७० टक्के पाम तेल इंडोनेशियामधून येते, तर ३० टक्के मलेशियामधून येते. २०२०-२१ मध्ये भारताने ८३.१ लाख टन पाम तेल आयात केले. आगामी काळात देशातील खाद्य तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना बसणार आहे.

भारतात उत्पादन तिप्पट करण्याचे उद्दिष्ट
इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे जागतिक अन्नधान्य महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. जो रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर विक्रमी पातळीवर आहे. देशात मोहरीच्या तेलाची किंमत जास्त आहे. दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे सूर्यफूल तेल खूप महाग झाले आहे. आता इंडोनेशियाची पाम तेल निर्यात थांबवल्यानंतर महागाई आणखी वाढणार आहे. भारत सरकार पाम तेल उत्पादनावर सतत भर देत आहे. राष्ट्रीय खाद्यतेलाच्या मोहिमेअंतर्गत २०२५-२६ पर्यंत भारतात पाम तेलाचे उत्पादन तिप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

किंमत कमी राहावी यासाठी लक्ष ठेवणार
याआधीही इंडोनेशियाने जानेवारीमध्ये पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती; परंतु ती मार्चमध्ये उठवली होती. यावेळी बंदी अशा वेळी लादली जात आहे जेव्हा देश आधीच महागाईने त्रस्त आहे. या निर्णयाने लोकांना स्वयंपाकाच्या तेलासाठी आणखी खिसा खाली करावा लागणार आहे. देशात खाद्यतेलाचा पुरवठा पुरेसा व्हावा तसेच त्याची किंमतही कमी राहावी यासाठी स्वतः लक्ष ठेवणार आहे, असे पामतेल निर्यातबंदी जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी म्हटले आहे.

Share