पुण्यात शिवसेनेला खिंडार; नाना भानगिरे एकनाथ शिंदे गटात सामील

पुणे : अवघ्या दहा दिवसांत पक्षातील ४० आमदार फोडून शिवसेना खिळखिळी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी पुण्यात शिवसेनेला खिंडार पाडले आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे आता एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. भानगिरे यांच्यापाठोपाठ पुण्यातील अनेक शिवसेना कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता संघटना वाचवण्याचे आव्हान उभे टाकले आहे.

नाना भानगिरे हे आतापर्यंत पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. हडपसर भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या नाना भानगिरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. भानगिरे यांना विधान परिषद आमदारपदाची संधी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. याकरिता फिल्डिंग लावण्यासाठी पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत पुणे महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. अशात आधीच पुण्यात शिवसेनेची ताकद जेमतेम असल्याने भानगिरे यांच्या रूपाने शिंदे गट पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नाना भानगिरे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे पुण्यात शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात ४० आमदारांसह बंड केले आणि
नंतर भाजपशी हातमिळवणी करत राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन केले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर उद्बवलेल्या राजकीय स्थितीत त्यांच्या पाठीशी पुण्यातील शिवसेनेची ताकद किती होती हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पुण्यातील त्यांच्या जवळचे असलेले हडपसर भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. आता फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे बडे नेतेदेखील शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. आधी माजी मंत्री आणि शिवसेनेचे मोठे नेते विजय शिवतारे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता आणि आता पुण्यातील बडे नाव असणारे नाना भानगिरे हेदेखील शिंदे गटात सामील झाल्याने आगामी काळात हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Share