वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळीत भरदिवसा निर्घृण हत्या

बंगळुरू: ‘सरळ वास्तू’ च्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर अंगाडी ऊर्फ चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकातील हुबळी येथील एका हॉटेलमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. आज दुपारी चंद्रशेखर हे या हॉटेलमध्ये कोणालातरी भेटायला गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हॉटेलच्या रिसेप्शनला लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हॉटेलच्या रिसेप्शनमध्येच चंद्रशेखर गुरुजी यांना हल्लेखोरांनी चाकूने भोसकल्याचे दिसत आहे. यानंतर तिथे उपस्थित लोक घाबरून पळत असल्याचेही दिसत आहे. चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येनंतर हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजी वैयक्तिक कामानिमित्त हुबळी येथे आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या कटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाला होता. यासाठीच ते हुबळी येथे आले होते, अशी माहिती आहे.

चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हुबळीतील हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. हुबळीतील हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये दोन व्यक्ती चंद्रशेखर यांना भेटायला आल्या. चंद्रशेखर सोफ्यावर बसताच दोघांनी त्यांना नमस्कार केला. एक जण त्यांच्या पाया पडला. त्यानंतर दोघांनी चंद्रशेखर यांच्यावर चाकूने सपासप वार सुरू केले. पुढच्या काही मिनिटांमध्ये चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात पडले. ते मरण पावल्याची खात्री करून हल्लेखोर तिथून निघून गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हुबळीच्या पोलिस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सांगितले की, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या दोन व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. पोलिसांनी चंद्रशेखर गुरुजी यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. मोबाईल टॉवरच्या आधारे आम्हाला काही माहिती मिळाली आहे. तपासानंतरच हत्येमागचे कारण समजू शकेल. आम्ही सध्या कुटुंबीयांचेही जबाब नोंदवत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

दिवसाढवळ्या हत्या हे भयंकर : मुख्यमंत्री बोम्मई
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर गुरुजींची हत्या ही अत्यंत भयंकर घटना आहे. ही घटना दिवसाढवळ्या घडली. व्हिडीओमध्ये दिसणार्‍या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस आयुक्त लभू राम यांच्याशी चर्चा केली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

चंद्रशेखर गुरुजी कोण होते?

चंद्रशेखर गुरुजी हे मूळचे कर्नाटकच्या बागलकोट येथील रहिवासी होते. तिथेच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली आणि ते येथेच स्थायिक झाले. दोन वर्ष त्यांनी रिअल इस्टेट कंपनीत काम केले. यानंतर त्यांनी नोकरी सोडून आपली कंपनी सुरू केली; पण एका व्यक्तीने त्यांची १५ लाखांना फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी अनेक गावं, शहरांचे दोरे केले. नंतर त्यांनी वास्तू विषयावर अभ्यास सुरू केला. ‘सरल वास्तू’ या कार्यक्रमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि ते घराघरात पोहोचले. वास्तू विषयावर त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले होते.

Share