औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा हाच महाराष्ट्राचा आधार आहे. तुम्ही सभेत फुले-शाहू-आंबेडकर यांचीच नावे घेता, असे कुण्या एका नेत्याने म्हटले. या नेत्याने प्रबोधनकार ठाकरे यांचे सामाजिक परिवर्तनाबाबतचे उत्तम लिखाण वाचावे, असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता दिला.
औरंगाबाद येथे मंगळवारी (२६ एप्रिल) महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टीचर्स असोसिएशनच्या (मुप्टा) रौप्य महोत्सवी अधिवेशनाच्या उदघाटन समारंभात बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, मुप्टाचे प्रमुख प्रा.सुनील मगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शरद पवार म्हणाले, देशात अनेकांचे राज्य होऊन गेले;परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले राज्य हे भोसलेंचे राज्य नव्हते ते रयतेचे, उपेक्षितांचे राज्य होते. त्यामुळे तीनशे वर्षानंतरही सर्वसामान्यांच्या अंत:करणात स्थान निर्माण करणारे राजा छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्व आणि योगदान सांगण्याची गरज नाही.
ज्यावेळी संपूर्ण समाज अस्वस्थ होता, मगरळलेला होता, सत्व जाग नव्हते, अशा समाजाच्या सर्व घटकांना एकत्र करून त्यांच्यातील स्वाभिमान आणि सत्व जागे करण्याचे मोलाचे काम छत्रपती शिवयारांनी केले आणि राज्य उभे केले. सत्ता सर्व सामाजासाठी, हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. हाच वारसा महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवला. महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे हे एक मोठे विचारवंत होऊन गेले. त्यांनी सामाजिक परिवर्तनाबाबत उत्तम लिखाण केले आहे. कोणी परवा मुंबईत भाषण केले अन् पवार फुले-शाहू-आंबेडकर यांचीच नावे मी घेताे, असे म्हणाले. त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, म्हणजे असे प्रश्न त्यांना पडणार नाहीत, असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता पवारांनी लगावला.