ॲड. गुणरत्न सदावर्ते १८ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवास्थानावर हल्ला प्रकरणातील आरोपी, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले आहेत. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी लगेचच ‘हम है हिंदुस्थानी’ अशी नारेबाजी केली.

शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर गेल्या ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन करून दगड व चप्पलफेक केली होती. ‘सिल्व्हर ओक’ येथील हल्ल्यामागे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे माथी भडकवल्याचा आरोप करत ॲड. सदावर्ते यांना ८ एप्रिल रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन वेळा पोलिस कोठडी सुनावली, तर एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली. ॲड. सदावर्ते यांच्यासह ११५ एसटी कामगारांना मुंबई सत्र न्यायालयाने २२ एप्रिल रोजी जामीन मंजूर करून दिलासा दिला. न्यायाधीश आर.एम. सादराणी यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना ५० हजारांच्या वैयक्तिक जाचमुचलका आणि तेवढ्याच रक्कमेचा हमीदार तर एसटी कामगारांना प्रत्येकी १० हजाराच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला आहे. अखेर आज जामीन मिळताच अ‍ॅड. सदावर्ते यांचा कारागृहाबाहेर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर आले. कारागृहातून बाहेर पडताच त्यांचा तोच जुना पुराना अंदाज आणि तोच तोरा दिसून आला.

अ‍ॅड. सदावर्ते कारागृहाबाहेर येताच त्यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील सदावर्ते यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते देखील कारागृहाबाहेर उपस्थित होती.
तब्बल १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका होताच ॲड.सदावर्ते म्हणाले की, सर्वसामान्यांच्या, कामगारांच्या न्याय हक्कासाठी मी लढलो. माझी सुटका म्हणजे भारताच्या संविधानाचा विजय आहे. भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. ‘जय श्रीराम’ म्हणणारे ‘जय भीम’ म्हणणारे आणि ‘हम है हिंदुस्थानी’ म्हणणारे जिंकत असतात. हा विजय हिंदुस्थान्यांचा आणि कष्टकरी बांधवांचा आहे. माझ्या कुटुंबाने आणि मित्र परिवाराने मला या अन्यायाविरोधात साथ दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. देशातील, राज्यातील कष्टकरी आमच्या सोबत होते. यापुढे आमचा केंद्रबिंदू भ्रष्टाचाराविरोधातील लढाई असेल. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे-जे करता येईल ते आम्ही करू, असे ॲड. सदावर्ते म्हणाले.

दरम्यान, सातारा पोलिस, कोल्हापूर पोलिस आणि पुणे पोलिस हे अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना ताबा मिळाला नाही. कोर्टाने पुणे पोलिसांना ॲड.सदावर्तेंना अटक करू नका, असे निर्देश दिले आहेत. कोर्टाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

Share