भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषेच्या वादावर प्रतिक्रिया देताना निशिकांत दुबे यांची जीभ घसरली. दुबे यांनी, ‘महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो. तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं?’ असा प्रश्न केला.
‘महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत, असे तारे देखील दुबे यांनी तोडले आहेत. सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता, अशी गरळ दुबे यांनी ओकली आहे.
हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनाही उघड आव्हान दिले आहे. “मुंबईत हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रातील उर्दू भाषिकांना मारहाण करा. स्वतःच्या घरात कुत्राही सिंह असतो. कोण कुत्रा आहे आणि कोण सिंह आहे ते तुम्हीच ठरवा.” असं डुबे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस ते जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरूद्ध लढाई केली. पानीपतची लढाई मराठे लढले होते. अहमद शाह अब्दालीने स्पष्टपणे तहाचे पत्र दिले होते. पंजाबपासून पेशावरपर्यंतचा भाग आम्हाला देऊन टाका, उर्वरित भारत हा मराठ्यांचा आहे हे आम्ही मान्य करू, पण मराठ्यांनी ते मान्य केलं नाही. मराठीत तुम्ही मुलुख अखंड भारत वाचवण्याकरता त्या ठिकाणी पानिपतच्या लढायला गेले होते त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नकारात असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.