मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारला येऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरुच आहेत. अशात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारमधील अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष त्या दाव्यानं वेधलं असल्याचं दिसत आहे.
अनिल देशमुख, अनिल परब, नवाब मलिक यांच्यावर भाजपकडून सातत्याने आरोप केले जात असतानाच अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. विधिमंडळात माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हटलं की, सध्या माजी ऊर्जामंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे की त्यांच्या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये जे काही कामं झालं, त्यांची चौकशी करा. तुमचं सरकार येऊन २८ महिने झाले. तुम्ही फक्त धमक्याच देत आहात. आमचा कुणी दोषी असेल, तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल, आम्ही घाबरत नाही. तुम्ही उत्तर द्या, २० दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत. सरकारी नोकराला अटक झाली, की २४ तासांत निलंबित करावं लागतं असा नियम आहे. तुम्ही त्याच्या वर जात आहात का?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.