चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी ११ पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी ११ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ८ पोलीस कर्माचरी तर ३ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली होती. त्यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, आता या घटनेनंतर ११ पोलिसांचं निलंबित करण्यात आलं आहे.

नेमकी घटना काय?
चंद्रकांत पाटील यांच्यावर काल सायंकाळी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला. पाटील हे चिंचवड गाव येथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली.

नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत, असं पाटील म्हणाले.

Share