रांची : झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्यातील मोहनपूर येथील त्रिकूट पर्वतावरील ‘रोप वे’ च्या दोन ट्रॉली एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर ४८ पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ पथकाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. रविवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. भारतीय हवाई दलाचे हेलिकाॅप्टर घटनास्थळी दाखल झाले असून, या हेलिकाॅप्टरच्या मदतीने अडकलेल्या आठ पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
या अपघातात दोन पर्यटक ठार झाले असून, मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून, त्यांना देवघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो पर्यटक पर्यटनासाठी त्रिकुट येथे दाखल झाले होते. यावेळी रोप वेची एक ट्रॉली खाली येत असताना वर जाणाऱ्या ट्रॉलीला ती धडकली. हा अपघात झाला त्यावेळी जवळपास दोन डझन ट्रॉली टेकडीवर जात होत्या. या सर्व ट्रॉली मध्येच थांबल्या. तांत्रिक बिघाडामुळे केबल कारची टक्कर होऊन हा अपघात झाला असावा, अशी शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
या दुर्घटनेत केबल कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न करताना पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील लोकांना सुरक्षित बाहेर एनडीआरएफ, भारतीय वायू सेना आणि गरुड कमांडो आदींची मदत घेतली जात आहे. ज्यांनी रोप वे बनवला होता, ती टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. लोकांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असून, सर्व हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली.
देवघरचे पोलिस उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. रोप वेवर केबल कारमध्ये अजूनही काही लोक अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे. सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत आहे. रोप वेवर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराच्या जवानांची मदत घेण्यात येत आहे. हेलिकॉप्टरने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.