यंदा २ लाख कि. मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार

नवी दिल्ली : मागील आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून १ लाख ४१ हजार १९० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते. त्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात २ लाख किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जाण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पीएम गतीशक्ती योजनेचा आढावा घेणारी बैठक नुकतीच केंद्रीय उद्योग आणि व्यापारमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

विविध मंत्रालये आणि खात्यांच्या अखत्यारितील विद्यमान आणि प्रस्तावित पायाभूत सुविधा कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारने पीएम गतीशक्ती योजना हाती घेतली आहे. पायाभूत सुविधा कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन खात्याच्या (डीपीआयआयटी) लॉजिस्टिक विभाग सांभाळणार्‍या विशेष सचिवांनी सादरीकरण केले. यावेळी मंत्रालयनिहाय झालेली विविध पायाभूत सुविधांची कामे आणि भविष्यातील कामांवर चर्चा करण्यात आली. पेट्रोलियम मंत्रालयाने गत आर्थिक वर्षात २० हजार किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन टाकली असून, चालू आर्थिक वर्षात ३४ हजार ५०० किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

ऊर्जा मंत्रालयाकडून सरत्या वर्षात ४ लाख ५४ हजार २०० किलोमीटर ट्रान्समिशन लाईनचे काम करण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा हे काम जास्त असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. गत आर्थिक वर्षात दूरसंचार खात्याकडून ३३ लाख ९९७ किलोमीटर लांबीचे ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यात आले होते. चालू आर्थिक वर्षासाठी ५० लाख किलोमीटर लांबीचे ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

Share