अंगावरील हळद वाळण्यापूर्वीच नवविवाहितेची आत्महत्या

हिंगोली : अंगावरील हळद निघण्यापूर्वीच एका १९ वर्षीय नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील मौजा येथे १३ एप्रिल रोजी ही घटना घडली. लग्नानंतर १९ व्या दिवशी या नवविवाहितेने आयुष्य संपवले. पल्लवी नागोराव टारफे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा तिचा पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील इंदिरानगर भागातील पल्लवी कऱ्हाळे (वय १९ वर्षे) या तरुणीचा विवाह २५ मार्च रोजी हिंगोली तालुक्यातील मौजा येथील नागोराव टारफे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या पल्लवीला अवघ्या दहा दिवसांतच सासरच्या छळाला सामोरे जावे लागले. तुला स्वयंपाक येत नाही, आम्ही मुलाचे दुसरीकडे लग्न केले असते, तर हुंडा जास्त मिळाला असता. त्यामुळे आता माहेराहून फ्रिज, शिलाई मशीन घेऊन येण्याचा तगादा सासरच्या लोकांनी लावला. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांतच सुरू झालेल्या छळाची माहिती पल्लवीने माहेरी दिली होती. मात्र, माहेरची आर्थिक परिस्‍थिती बेताची असल्याने व काही दिवसांपूर्वीच लग्नाचा खर्च झाल्यामुळे पल्लवीच्या सासरच्या मंडळींची मागणी तिच्या कुटुंबियांना पूर्ण करता आली नाही.

दरम्यान, पल्लवीच्या माहेरी विवाह सोहळा असल्यामुळे तिचा चुलत भाऊ तिला घेण्यासाठी मौजा येथे गेला होता. मात्र, तिच्या सासरच्या मंडळींनी तिला पाठवले नाही. सासरी होणारा छळ व लग्नाला न पाठवल्यामुळे पल्लवीने घरी कोणी नसताना बुधवारी (१३ एप्रिल) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.


या प्रकरणी पल्लवीची आई सुनीता केशव कऱ्हाळे यांनी बासंबा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पल्लवीचा पती नागोराव किसन टारफे, सासरा किसन टारफे आणि सासू निर्मलाबाई टारफे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, उपनिरीक्षक सुरेश भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यामधील तिन्ही आरोपी पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Share