विभास साठे यांच्या जीवाला धोका, त्यांचा मनसुख हिरेन होऊ शकतो : किरीट सोमय्या

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. परब यांनी या रिसॉर्टसाठी विभास साठे यांच्याकडून जमीन विकत घेतली आहे. आता विभास साठे यांच्या जीवाला धोका असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करून साठे यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी, अशी विनंती सोमय्या यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना एका पत्राद्वारे केली आहे.

परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २७ मे रोजी छापे टाकले होते. अनिल परब यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साथे यांच्या पुण्यातील कोथरुड भागातील घरावरही छापा टाकण्यात आला होता. विभास साठे यांच्या कोथरुडमधील कार्यालयातही छापेमारी करण्यात आली होती. या साऱ्या घटनाक्रमानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टच्या जमिनीचे मूळ मालक विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ शकतो, असे ट्विट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ट्विटसोबत राज्याच्या पोलिस महासंचालकांना लिहिलेले पत्रही सोमय्या यांनी शेअर केले आहे.

पोलिस महासंचालकाना लिहिलेल्या पत्रात सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा व संस्थांनी तसेच राज्याचे पर्यावरण मंत्रालय व केंद्र सरकार यांनी अनिल परब व त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर कारवाई करण्याचाही निर्णय घेतला आहे. मंत्री अनिल परब यांनी मे २०१७ मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली व फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग करून तिथे रिसॉर्ट बांधला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी या पत्रात केला आहे.

अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले असून आम्हाला भीती वाटते की, अनिल परब हे विभास साठेंवर दडपण आणणार. विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये हे पाहणे महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी आहे. विभास साठे यांच्या जीवाला धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी. त्यांचा मनसुख हिरेन होऊ नये हे पहावे ही विनंती, असेही सोमय्या यांनी या पत्रात म्हटले आहे.

ही नौटंकी गेल्या वर्षभरापासून सुरू, त्याला उत्तर देण्यास बांधील नाही : अनिल परब

किरीट सोमय्यांच्या दाव्याबद्दल विचारले असता अनिल परब म्हणाले, मी किरीट सोमय्यांना कोणतेही उत्तर देण्यास बांधील नाही. मी त्यांना आजपर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही. ज्या यंत्रणांकडे तक्रार करण्याचा त्यांना अधिकार आहे त्यातील अधिकारी आम्हाला जे प्रश्न विचारत आहेत त्यांची उत्तरे आम्ही उत्तर देत आहोत. ही नौटंकी गेल्या वर्षभरापासून सुरू असून त्याला उत्तर देण्यास बांधील नाही. जे काही आरोप असतील ते त्यांनी यंत्रणेकडे करावेत, ते आमची चौकशी करतील. त्यातून सत्य समोर येईल, असेही परब म्हणाले.

Share