काश्मीरमध्ये बँकेत घुसून व्यवस्थापकाची गोळ्या घालून हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी राजस्थानमधील एका बँक व्यवस्थापकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. विजय कुमार असे त्या व्यवस्थापकाचे नाव आहे. दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील अरे मोहनपोरा गावात बँकेत घुसून विजय कुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

विजय कुमार हे कुलगाम जिल्ह्यातील अरेह मोहनपोरा येथील इलाकी देहाती बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारला होता. दहशतवाद्यांनी आज सकाळी बँकेच्या परिसरातच विजय कुमार यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर जखमी झालेल्या विजय कुमार यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विजय कुमार हे राजस्थानमधील हनुमानगढ येथील रहिवासी होते. या घटनेनंतर हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलिसांनी या परिसराची नाकेबंदी केली आहे. स्थानिक पोलिस अधिक तपास करीत आहेत. ‘एएनआय’ कडे हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार एक अज्ञात व्यक्ती बँकेत घुसून गोळ्या झाडत असल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये परराज्यांतून आलेल्या लोकांची हत्या करण्याचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच बडगाममध्ये तहसील कार्यालयात घसून सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती, तर दोन दिवसांपूर्वीच म्हणजे मंगळवारी कुलगाममध्ये काश्मिरी पंडित असलेल्या रजनी बाला या ३६ वर्षीय हिंदू शिक्षिकेची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ आज पुन्हा दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांना टार्गेट केले आहे. या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांकडून परराज्यातून आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याची मागणी केली जात आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने बुधवारीच याबाबत आदेश दिले होते. ६ जूनपर्यंत अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षित स्थळी बदली केली जाऊ शकते. काश्मिरात हत्येच्या घटना वाढल्याने केंद्रीय गृहमंत्रालय अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. यावेळी अमित शहा हे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या हत्यासत्रामुळे हिंदू निर्वासितांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. पंतप्रधान विशेष पॅकेजअंतर्गत नोकऱ्या मिळालेल्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून, येत्या २४ तासांत आम्हाला सुरक्षित ठिकाणी न हलवल्यास खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात येईल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

Share