मराठवाडा विद्यापीठ परीक्षेत पहिल्याच दिवशी गोंधळ, एका बाकावर तिघांनी बसून दिली परीक्षा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षांचा गोंधळ पाहायला मिळाला. विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच, परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली. सकाळी नऊ वाजता सुरू होणारा पेपर बारा वाजेला सुरु झाला. मात्र यातून मार्ग काढू, तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.  अशी माहिती विद्यापीठ परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत होत्या, परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर विद्यापीठ प्रशासनाने सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. परंतु दोन वर्षाच्या अंतराने केलेल्या या नियोजनात अनेक त्रुटी असल्याचे चित्र आज दिसले.

प्राचार्य म्हणतात..

आज सकाळी विद्यार्थी संख्या वाढविल्याची माहिती विद्यापीठ प्रशसनाने दिली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी एका बाकावर तीन विद्यार्थी बसविण्यात आले आहेत. मात्र, तिन्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विषय वेगळा आहे. त्याचे नियोजन केले आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ.सतीश सुराणा यांनी दिली.

त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्या…

मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला याप्रकरणी आजचा पेपर पुन्हा नव्याने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका बाकावर तीन-तीन विद्यार्थी त्यात एकच प्रश्नपत्रिका देण्यात आली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे सामंत म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांनी एका वर्गात बसुन परीक्षा दिली. एका बाकावर तीन-तीन जण होते, ही काही परीक्षेची पद्धत असू शकत नाही.त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याची सूचना सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिली आहे. तसेच, पदवी परीक्षेतील ही फार मोठी चूक आहे. ही चूक विद्यापीठाकडून झाली की, महाविद्यालयाकडून याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  एका बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवणे हे चुकीचे आहे. हे ठिसाळ नियोजन कुणामुळे झाले, जाणिवपूर्वक झाले का? या संदर्भात सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही सामंत म्हणाले.

Share