नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल गांधींची ‘ही’ विनंती ईडीकडून मान्य

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काॅंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. राहुल गांधी यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे. मात्र, राहुल गांधींनी चौकशीसाठी पुढची तारीख मिळावी, अशी विनंती केल्यानंतर ईडीनं ही तारीख आता बदलली आहे. आता राहुल गांधींना चौकशीसाठी १० दिवस नंतरची तारीख देण्यात आली आहे. सध्या राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी तारीख बदलून देण्याची विनंती ईडीला केली होती असं एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १ जून रोजी ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. सोनिया गांधी यांना ईडीने ८ जून रोजी मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे, तर राहुल गांधी यांना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. दरम्यान, सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असून काँग्रेस अध्यक्षा ८ तारखेला ईडीसमोर हजर राहतात की नाही हे पाहावं लागेल. मात्र, दिलेल्या तारखेला ती तपास यंत्रणेसमोर हजर होईल, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण?‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.

सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली होती. गांधी कुटुंबीयांकडे ‘नॅशनल हेरॉल्ड’ ची मालकी असताना फसवणूक आणि आर्थिक अनियमितता झाल्याचे या तक्रारीत म्हटले होते. ‘यंग इंडिया’ कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नावावर असल्यामुळे या प्रकरणाला महत्त्व आले आहे. यापूर्वी १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांची ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. त्याच्याकडून आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर चौकशी करण्यात आली.

Share