संकर्षण कऱ्हाडे आईबरोबर गेला भाजी खरेदीला

मुंबई : संकर्षण कऱ्हाडे हा मराठी नाट्य आणि मालिका विश्वातील हरहुन्नरी कलाकार. संकर्षण हा उत्तम अभिनेता तर आहेच; शिवाय तो संवेदनशील कवी, लेखक आणि दिग्दर्शकही आहे. संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रिय आहे. सोशल मीडियावर तो नेहमीच विविध पोस्ट करत असतो. संकर्षणने अलिकडेच सोशल मीडियावर त्याचा आईबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे.

संकर्षण आईबरोबर बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गेला असतानाचा हा फोटो आहे. हा फोटो शेअर करत त्याने एक मजेशीर कॅप्शनदेखील लिहिली आहे. संकर्षणने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘आई… किती तरी वर्षांनी मी आईसोबत भाजी मंडईत पिशव्या उचलतोय…भाजी घेतानाचा आईचा ‘कॉन्फिडन्स’, त्याला तोड नाही…आईच्या हातची चव इतकी कमाल आहे की, भाज्या ओरडून ओरडून म्हणत होत्या… आम्हाला घेऊन जा…’

https://www.instagram.com/p/CeSdKoUpFkU/?utm_source=ig_web_copy_link

संकर्षणची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. त्याने केलेल्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री शिवानी बोरकर हिने संकर्षणच्या पोस्टवर लिहिले आहे की, ‘कित्ती गोड…’ तर एका युजरने लिहिले आहे की, ‘माणूस कितीही मोठा सेलिब्रिटी झाला तरी आईसोबत मंडईत गेल्यावर पिशव्याच उचलायला लागतात…’

सध्या संकर्षण कऱ्हाडे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझी माझी रेशीमगाठ’ आणि ‘मसालेदार किचन कल्लाकार’ या कार्यक्रमांमधून घराघरांत पोहोचला आहे. त्याच्या अभिनयावर, त्याच्या विनोदबुद्धीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या संकर्षणने त्याची रंगभूमीशी असलेले नातेही तितक्याच जिव्हाळ्याने जपले आहे. ‘तू म्हणशील तसं’ सारख्या नाटकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नाटकाचे दौरे असो वा कुठली नवीन सुचलेली एखादी कविता संकर्षण सोशल मीडियावर शेअर करत असतो. या सगळ्या कामाच्या व्यापातून वेळ काढत तो घरातल्यांसोबत वेळ घालवतो. एवढेच नाही तर त्याच्या आयुष्यातील काही खास क्षणदेखील तो शेअर करत असतो.

https://www.instagram.com/p/CSBoQKWMrLR/?utm_source=ig_web_copy_link

काही दिवसांपूर्वी संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या चिमुकल्या बाळांसोबतचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना त्यांची नावंही चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यांची नावं होती चि. सर्वज्ञ संकर्षण कऱ्हाडे, कु. स्रग्वी संकर्षण कऱ्हाडे. हे क्युट फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते.

Share