न्यूयॉर्क : अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे आज (५ जून) पुन्हा गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अमेरिकेत शस्त्र परवानासंदर्भातील धोरणाचे अत्यंत गंभीर परिणाम दिसून येत आहेत. गकल्या काही दिवसांपासून अमेरिकेत वारंवार सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत आहेत. तीन दिवसांपूर्वी ओक्लाहोमा येथील एका रुग्णालयाच्या आवारात तरुणाने गोळीबार केला होता. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज रविवारी पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून, यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज (५ जून) फिलाडेल्फिया येथे पुन्हा गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले. अमेरिकेत वारंवार गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यामध्ये आजवर अनेक निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
At least three dead, 11 injured in a shooting incident in Philadelphia: US media
— ANI (@ANI) June 5, 2022
याआधी २ जून रोजी ओक्लाहोमा येथील सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलच्या आवारात गोळीबार झाला होता. यामध्ये चार जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या गोळीबारात शूटरसह चार जण ठार झाल्याचे तुलसा पोलिसांनी सांगितले. हॉस्पिटलच्या कॅम्पसमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रायफल असलेल्या एका व्यक्तीने गोळीबार केल्याचा पोलिसांना फोन आला होता. त्यानंतर पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले; परंतु तोपर्यंत अनेकांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. यामध्ये एका जोडप्याचाही मृत्यू झाला होता.
या घटनेच्या काही दिवसांपूर्वी पार्किंगच्या वादातून अमेरिकेत गोळीबार झाला होता. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. याशिवाय टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात २१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण जग हादरले होते. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले होते.