…तर बाळासाहेबांनी असे सरकार बनवण्याचा प्रस्ताव आणणाऱ्यांच्या पेकाटात लाथ घातली असती!

मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत कधीच युती केली नसती. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सध्या जे सरकार आहे ते सरकार बनवण्याचा प्रस्ताव आणणाऱ्यांच्या पेकाटात बाळासाहेबांनी लाथ घातली असती, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे. संजय राऊत यांना ‘स्मृतीभ्रंश’ झाला असून, ते लाचार असल्याची खोचक टीका गजानन काळे यांनी केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील सरकार असल्याचे वक्तव्य काल (४ जून) केले होते. त्याच वक्तव्यावरुन आता मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी संजय राऊतांसह शिवसेनेवर निशाणा साधला.

गजानन काळे म्हणाले, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी राष्ट्रवादीसोबत कधीच युती केली नसती. बाळासाहेबांनी ज्या विचारांनी शिवसेना स्थापन केली ते विचार आताच्या ठाकरे सरकारमध्ये नसल्याचा आरोप काळे यांनी केला.

संजय राऊत म्हणतात की, आताचे सरकार हे बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. आज बाळासाहेब असते तर हे सरकार बनवण्याचा प्रस्ताव आणणाऱ्यांच्या पेकाटात त्यांनी लाथ घातली असती. हिंदू द्वेष करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीबद्दल बाळासाहेबांनी अनेकदा आसूड ओढले आहेत. लाचार संजय राऊत यांना स्मृतीभ्रंश झाला आहे, अशी टीका गजानन काळे यांनी केली.

Share