सभेपूर्वी शहरासंबंधीचे १३ प्रश्न भाजपने विचारले मुख्यमंत्र्यांना

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठ जून रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. याच सभेपूर्वी भाजपने शहरातील १३ प्रश्न मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे विचारले आहे. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले. काल दि.५ रोजी भाजप शहरजिल्हा अध्यक्ष संजय केनेकर आणि आमदार अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती दिली. यावेळी प्रशांत देसरडा, नितीन चित्ते, संजय जोरले, राम बुधवंत आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केनेकर म्हणाले, ‘शहरातील पाणीप्रश्न गंभीर आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. आम्ही जलआक्रोश मोर्चा काढला. त्यानंतरही वितरण व्यवस्थेत अजून बदल झालेला नाही. जनतेची पिळवणूक सुरू असताना मुख्यमंत्री आठ जून रोजी स्वाभिमान सभा घेत आहेत. आम्ही भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांसमोर १३ प्रश्नांचे निवेदन सादर करणार आहोत.  पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे, व्यवस्था कोलमडली आहे. ही व्यवस्था सुधारणा का, पाणीवितरण प्रणालीत ताबडतोब सुधारणा करणार का, ५० टक्के पाणीपट्टी कपातीची तारीख कधी निश्चित करणार, जलवाहिनीचे पाइप तयार करण्याच्या कामाला गती देणार का, औरंगाबादचे संभाजीनगर करणार का आदी प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे विचारणार आहोत.

आमदार सावे म्हणाले, ‘नियमित पाणी दिले जात नाही तोवर पाणीपट्टी आकारू नये, अशी आमची मागणी आहे. औरंगाबाद नामकरणाचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करून राज्य सरकारकडे आणि तिथून केंद्राकडे पाठवावा लागतो. इतके वर्ष महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती त्यांच्या मनात असले असते तर तेव्हाच प्रस्ताव मंजूर करुन घेतला असता. मात्र शिवसेनेत ती हिंमत नाही.’ ‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी शिवसेनेला ओढावून घ्यायची नाही. जर संभाजीनगरचा प्रस्ताव मंजूर करुन पाठवला तर केंद्रातून आम्ही मंजूर करून आणू,’ असे सावे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share