सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; पुण्यातून दोन शार्प शुटर्सला अटक

पुणे : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन आता समोर आले आहे. सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे शार्प शुटर्स पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली असून, त्या दोन आरोपींना पंजाब पोलिसांनी आज सकाळी अटक केली. संतोष जाधव आणि सौरव महांकाळ अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील असल्याचे समोर आले आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला ऊर्फ शुभदीप सिंह यांच्यावर २९ मे २०२२ रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. या हल्ल्यात मुसेवाला यांच्यासोबत गाडीत असणारा त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र गंभीर जखमी झाला होता. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधीच पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि कॅनडास्थित गँगस्टर सतींदर सिंग ऊर्फ गोल्डी ब्रार यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचा पंजाब पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिस चौकशीत रोज नवनवे खुलासे होत आहेत. मुसेवाला यांच्यावर हल्ला करण्यासाठी आठ शार्प शूटर नेमण्यात आले होते. त्यापैकी दोघे पुण्याचे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पंजाब पोलिसांनी यापूर्वीच देवेंद्र ऊर्फ काला याला हरियाणातील फतेहबाद येथून अटक केली आहे.

सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण आठ जणांना सुपारी देण्यात आली होती. चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. यापैकी तिघे पंजाबमधील तर हरियाणा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोघे तर एक शूटर हा राजस्थानचा होता, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. यामध्ये पुण्यातील संतोष जाधव आणि सौरव महांकाळ या दोघांचा समावेश आहे. या दोघांनाही पंजाब पोलिसांनी पुण्यातून आज सकाळी अटक केली आहे. संतोष जाधव हा मंचरचा सराईत गुन्हेगार आहे. ओंकार ऊर्फ राण्या बाणखेलेच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार असून, पुणे गुन्हे शाखेकडून त्याचा शोध सुरू आहे. आता त्याचे नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातदेखील समोर आले आहे.

पोलिसांनी यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येसाठी एएन-९४ ही रशियन बनावटीची असॉल्ट रायफल वापरण्यात आली. अशा प्रकारे पंजाबमधील गँगवॉरदरम्यान एएन-९४ रायफल वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिद्धू मुसेवाला यांच्यावर २ मिनिटांमध्ये ३० गोळ्या झाडण्यात आल्या. समोर आलेल्या माहितीनुसार मुसेवाला यांच्या गावात हल्लेखोर पोहोचले तेव्हा मुसेवाला यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे एके-४७ बंदुका घेऊन असलेले कमांडो पाहून परतले. त्यानंतर त्यांनी कॅनडामधील गँगस्टर सतींदर सिंग उर्फ गोल्डी ब्रारकडून एएन-९४ रायफल मागवली. याच रायफलने मुसेवाला यांची हत्या करण्यात आली.

सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या

सिद्धू मुसेवाला हे आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीतून गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत प्रवास करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यावेळी सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

सिद्धू मुसेवाला यांना चार सशस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने या सुरक्षेमध्ये कपात करून केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले होते. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही आहे. मात्र, ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने प्रवास करत होते.

सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवाला यांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र, अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केला. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करून तिथून पळ काढला. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Share