नाशिकमध्ये उद्योजकाचा भरदिवसा खून; तलवार आणि कोयत्याने केला हल्ला

नाशिक : नाशिक शहरात आज सकाळी पुन्हा एक खुनाची घटना घडली. अंबड औद्योगिक वसाहतीमधील आहेर इंजिनीअरिंग कंपनीचे संचालक नंदकुमार आहेर (वय ५० वर्षे, रा. महात्मानगर) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आहेर यांना खासगी रुग्णालयात दाखल करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.

नाशिकमध्ये जून महिन्यातील हा दुसरा तर दोन महिन्यातील आठवा खून झाला आहे. या घटनेमुळे नाशिक व परिसरात खळबळ उडाली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये गंगाविहार हॉटेलनजीक किर्लोस्कर कंपनीजवळ नंदकुमार आहेर (वय ५० वर्षे, रा. महात्मानगर) यांची आहेर इंजिनीअरिंग ही कंपनी आहे. नेहमीप्रमाणे आज मंगळवारी (७ जून) सकाळी साडेदहा वाजता नंदकुमार आहेर हे कंपनीत गेले. ते कंपनीच्या प्रवेशद्वारावर कारमधून उतरत होते. यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी आहेर यांच्यावर तलवारीने आणि कोयत्याने सपासप वार केले.

या हल्ल्यात नंदकुमार आहेर गंभीर जखमी झाले. अधिक रक्तस्त्रावामुळे आहेर जागीच कोसळले. त्यांचा आवाज ऐकून कंपनीतून धावत आलेल्या कामगारांनी आणि नंदकुमार आहेर यांचे पुतणे प्रवीण आहेर यांनी नंदकुमार आहेर यांना त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले; परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत नंदकुमार आहेर हे एका कॅबिनेट मंत्र्यांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार आहेर यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर वीस वर्षांच्या आतील असल्याचा अंदाज असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अंबड पोलिसांसह गुन्हे शाखा व नाशिक पोलिस आयुक्तालयाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

नाशिक शहरात मे महिन्यात सहा आणि जूनमध्ये दोन खून झाल्याने नाशिक हादरले आहे. मागील १८ दिवसांत ८ जणांची हत्या झाली आहे, तर गेल्या दोन दिवसात तीन जणांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Share